सोलापूर : सोलापूर शहरात वाढती बेरोजगारी आणि रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक तरुणांनी जोड व्यवसाय म्हणून रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी सेवेकडे वळण्यास सुरुवात केली आहे. अल्प भांडवलात उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असल्याने अनेक युवक या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र,आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर नियमांची पुरेशी माहिती नसल्याने काही चालकांवर मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे.
अलीकडेच सोलापुरात रॅपिडो ॲपवरून अवघ्या २० रुपयांच्या प्रवासासाठी निघालेल्या एका चालकावर उप प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करत तब्बल १० हजार रुपयांचा दंड आकारल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रॅपिडो चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे,सोलापूर शहर व जिल्ह्यात रॅपिडो किंवा बाईक टॅक्सी संदर्भातील नियमांविषयी उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात आली नसल्याची खंत नागरिक आणि चालक व्यक्त करत आहेत. अनेक तरुणांना हा व्यवसाय सुरू करताना कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत,कोणते नियम लागू आहेत किंवा कोणत्या परिस्थितीत दंडात्मक कारवाई होऊ शकते,याची स्पष्ट माहिती नसल्याचे दिसून येत आहे.
स्थानिकांच्या मते,नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरी त्यापूर्वी संबंधित विभागाने चालकांना मार्गदर्शन करणे,जनजागृती मोहीम राबविणे आणि कायदेशीर बाबी स्पष्ट करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा बेरोजगारीच्या काळात रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र,वारंवार संपर्क करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान,रॅपिडो चालक आणि नागरिकांनी परिवहन विभागाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात,जनजागृती मोहीम राबवावी आणि चालकांना कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगावी,अशी मागणी केली आहे. तसेच रॅपिडोसारख्या सेवांबाबत राज्य सरकारची स्पष्ट धोरणात्मक भूमिका जाहीर करण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.
