Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषा माणसांना समृद्ध बनवते : डॉ.शिवाजी शिंदे


           मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

मराठी भाषेत मोठी शक्ती आणि श्रीमंती : जवळकोटे 

सोलापूर : दि.२३ (एमडी२४न्यूज)  माणसा माणसांमधील संवाद कमी होत आहे. त्यामुळे मराठी भाषेतून संवाद सर्वांनी वाढवला पाहिजे. प्रत्येकाने दोन पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत. मराठी भाषा ही माणसांना समृद्ध बनवते. या भाषेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत,असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले. 
           
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद,जुळे सोलापूर,महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने २०  ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूसबुधवार दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.३० वाजता महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूस खुल्या जागेत मराठी भाषा-अभिजात दर्जा आणि आपण या विषयावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांचे तसेच मराठी भाषा आणि पत्रकारिता या विषयावर दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 
      
डॉ.शिवाजी शिंदे पुढे म्हणाले,केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. अभिजात दर्जा म्हणजे काय ? निकष,मराठी भाषेचे महत्व,इतिहास यासह विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण अशी मांडणी त्यांनी यावेळी केली. सध्याच्या स्थितीत इमारतीची उंची वाढली पण माणुसकी खुजी झाली. रस्ते रुंद तर दृष्टी अरुंद झाली. माणसांना माणसास भेटण्यास वेळ नाही. औषध भरपूर पण आरोग्य कमी झालं. मनामध्ये काही साठवून ठेवू नका. व्यक्त व्हा ! मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी एकमेकांमधला संवाद वाढवा. भाषा समृद्ध करण्याची देखील वैयक्तिक जबाबदारी असून सर्वांनी मराठी भाषेतून संवाद करायला हवा. सर्वांनी दरवर्षी किमान दोन पुस्तके वाचावीत,किमान दोन नाटक,चित्रपट पाहवीत, असे आवाहनही यावेळी डॉ.शिंदे यांनी केले.
       
मराठी भाषेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. मराठीने आपल्या सर्वांना समृद्ध केले आहे. त्यामुळे आपली भाषा बोलताना बुजरेपण बाळगू नये. आपली भाषा बोलताना न्यूनगंड कसला बाळगायचा ? या पद्धतीने वागत राहिल्यास आपणच आपल्या भाषेचे मारेकरी होतो की काय अशी भीती निर्माण होऊ शकते,असेही डॉ.शिंदे म्हणाले.
           
सूत्रसंचालन प्रा.अमोगसिद्ध चेंडके,प्रा.नानासाहेब गव्हाणे यांनी केले. आभार प्रदर्शन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले. 

याप्रसंगी मसाप जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यवाह गिरीश दुनाखे,मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे,अ.भा.मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे,दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी, कर्मचारी नागरिकांनी,साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा ही अधिक समृद्ध : सचिन जवळकोटे - कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे म्हणाले,मराठी भाषा ही अधिक समृद्ध शक्तिशाली आणि श्रीमंत अशी भाषा आहे. एकमेव मराठी भाषा अशी आहे की तिचे एकाच शब्दाचे विविध अर्थ निघतात. या मराठी भाषेमुळेच मी आज इथपर्यंत आलो. मराठी भाषेतूनच विविध सदरे आणि लेखन करता आली. जी लोकांना भावली आणि तीच माझी ओळख निर्माण झाली. सर्वांनी मराठी भाषेचा उपयोग निश्चितच केला पाहिजे. सोलापुरात विविध प्रकारच्या २३ भाषा बोलल्या जातात. त्यात मराठी भाषेमध्ये विविध परिसरात वेगवेगळी शैली आहे.