Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा; सहआरोपीला 3 वर्षांचा कारावास


माळशिरस न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; पोक्सो प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई

सोलापूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपीला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील सहआरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एल.डी.हुली,जिल्हा व सत्र न्यायाधीश-2,माळशिरस यांच्या न्यायालयात चाललेल्या स्पेशल पोक्सो केस क्र. 08/2024 मध्ये हा निकाल देण्यात आला.

अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 785/2023 नुसार भारतीय दंड संहिता कलम 363, 376(2)(N), 34 तसेच पोक्सो कायदा कलम 4, 8,12 व 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीनंतर उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

मुख्य आरोपीला 20 वर्षांची शिक्षा - या प्रकरणातील आरोपी अमर रहीम शेख याला भारतीय दंड संहिता कलम 363 सह कलम 34 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच पोक्सो कायदा कलम 4 अन्वये त्याला 20 वर्षे सश्रम कारावास व 7 हजार रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.





सहआरोपीस 3 वर्षांचा सश्रम कारावास - आरोपी तसलीम ताजुद्दीन शेख याला भारतीय दंड संहिता कलम 363 सह कलम 34 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
सरकारी अभियोक्त्यांचा प्रभावी युक्तिवाद

या गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक जी.बी.चौधरी यांनी केला. न्यायालयीन कामकाजात सरकारी अभियोक्ता ॲड.संग्राम पाटील यांनी शासन पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपींविरुद्ध ठोस युक्तिवाद केला.

या प्रकरणाच्या तपासासाठी व न्यायालयीन कामकाजासाठी अतुल कुलकर्णी,पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण आणि विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच संतोष वाळके,उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज आणि नीरज उबाळे,प्रभारी अधिकारी,अकलूज पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली.





या प्रकरणात पोसई विजय जाधव यांनी न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून समन्वयाची जबाबदारी पार पाडली. तसेच पोहेकॉ/1430 तांबोळी आणि पोकॉ/1053 हांगे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत प्रभावी न्यायालयीन पैरवी केली.

“गंभीर गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण”
याप्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, “सोलापूर ग्रामीण पोलीस अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबून असून,अशा गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी तपास व सक्षम न्यायालयीन पैरवी करण्यास कटिबद्ध आहेत.”

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून तपास आणि न्यायालयीन पैरवीवर विशेष भर दिला जात असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.