Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या ‘सुजन अभियानात’ अनागोंदी; सोलापुरातून ‘सपकाळ हटाव’ मोहिमेची सुरुवात


सोलापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ‘सुजन अभियान’ कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करत नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात “सपकाळ हटाव” मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानाच्या नियोजनातील गोंधळ, कार्यकर्त्यांना डावलणे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचा आरोप करण्यात आला.

कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी आमदार देवाशिष पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिल्ली येथे ‘सुजन अभियान’ संदर्भात निपक्षपातीपणे अहवाल सादर केला असतानाही त्यामध्ये राजकारण करून नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.



यासंदर्भात निरीक्षक देवाशिष पटनायक यांना जाब विचारला असता, “मी योग्य तो अहवाल दिलेला आहे. यात काही गडबड झाली असल्यास त्याचा पाठपुरावा दिल्ली दरबारी करेन,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला.
ही संपूर्ण ‘सुजन अभियान’ प्रक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबविण्यात आली. मात्र,या प्रकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचा आरोप नाराज गटाने केला आहे.

“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या प्रकरणात ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता दिल्लीचे नाव पुढे करून पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट करायचा असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ पदावरून हटवावे,” अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी केली. ही मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देणे, कार्यक्रमाची माहिती वेळेत न देणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर “सपकाळ हटाव” मोहिम राज्यभर राबविण्याचा इशारा नाराज कार्यकर्त्यांनी दिला आहे.

नाराज गटाने पत्रकार परिषद घेऊन पक्ष नेतृत्वाकडे अधिकृत तक्रार पाठविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच राज्यस्तरीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. “पक्ष मजबूत करण्याऐवजी काही जण स्वतःची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संघटनात्मक नुकसान होत आहे,” असा आरोप विजयकुमार हत्तुरे यांनी केला.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कौलगे पाटील, खैरे पाटील आदी उपस्थित होते.