Ticker

6/recent/ticker-posts

संवेदनशील पोलिसिंगचा आदर्श; वैराग पोलिसांनी अपंग शेतकऱ्याला मिळवून दिली हक्काची अडीच एकर जमीन


सोलापूर : बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील एका अपंग शेतकऱ्याची अडीच एकर शेतजमीन आर्थिक व्यवहाराच्या गुंत्यात अडकून पडली होती. हक्काची जमीन गमावण्याच्या भीतीने हा शेतकरी नैराश्यात गेला असून आत्महत्येच्या मानसिकतेत असल्याची माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळताच त्यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला.

गावचे पोलीस पाटील गणेश मसाळ यांच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना वैराग पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिस निरीक्षक गावडे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. संबंधित जमीन आर्थिक व्यवहारामुळे अडकून पडल्याचे समोर आल्यानंतर दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढण्यात आला.

गावडे यांनी सुचविलेला समझोत्याचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी आनंदाने स्वीकारला. परिणामी कोणताही वाद किंवा संघर्ष न होता शेतकऱ्याला त्याची हक्काची अडीच एकर जमीन परत मिळाली.



यावेळी पोलिस निरीक्षक कुंदन गावडे म्हणाले की,समाजात पोलिसांविषयी अनेकदा अवास्तव भीती निर्माण झालेली असते. मात्र पोलीसही संवेदनशीलतेने काम करणारी यंत्रणा आहे. अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करताना वाद टाळून संवाद आणि समझोत्याचा मार्ग स्वीकारल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतात.

दरम्यान,अपंग शेतकऱ्याची विवंचना दूर करून त्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल अतुल कुलकर्णी तसेच अंजना कृष्णा यांनी वैराग पोलीस ठाण्याच्या कार्याचे कौतुक केले आहे.
ही घटना पोलिसांच्या संवेदनशील आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.